विशेष प्रतिनिधी
पिंपरी : सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती समजल्यावर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोपखेले येथे रविवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. (Retired Subhedar commits unnatural sexual assault on 13yearold son locals beat him up and handed him over to the police)
लाला मोहम्मद शेख (६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (दि. १४ एप्रिल) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात. शेख हा त्याच्या खोलीत पीडीत १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाली. त्यांनी शेख याला पकडून मारहाण केली. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी झाल्याने शेख याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.