विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : गोळीबार करत पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा करणाऱ्या दरोडेखोरावर प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याचा एन्काऊंटर झाला. अमोल खोतकर असे या दरोडेखोराचे नाव आहे. बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर त्याने साथीदारांसह दरोडा घातला होता. ( Robber who rammed car into police while firing killed in encounter)
वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. खोतकर वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहचला. तेव्हा आरोपीने गोळीबार केला. त्यात तो ठार झाला.
छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. 7 मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. 15 मे रोजी रात्री 2 ते 4 या दरम्यान 6 दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी असा 6 कोटींचा ऐवज लंपास केला होता.
11 दिवसांपासून गुन्हे शाखेचे 7 आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील 2 अशी पथकं तपास करत होती. त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती.
दरोडा प्रकरणात पोलिसांनी 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचे समोर येत होते. त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्यातच तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समोर आले होते. त्याला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगण्यात आली होती. काल मध्यरात्री पोलिसांनी तो असलेल्या परिसराला गराडा घातला. त्याची चाहुल आरोपीला लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गोळीबार करत पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा एन्काऊंटर झाला.