विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आयोगाला पूर्ण अध्यक्ष नेमा अशी मागणी केली आहे.
( Rohini Khadse the full-time chairperson of the Womens Commission targets Rupali Chakankar)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. वैष्णवीचे राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील पदाधिकारी आहेत. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावरून रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधताना खडसे म्हणाल्या, सध्याच्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा, असे रोहिणी खडसे यांचे म्हणणे आहे. पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये. कारण त्याचा फरक थेट महिलांवरील प्रश्नांवर पडेल. त्यामुळे आता राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या अशी.
खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की , सध्या राज्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण केंद्र स्थानी आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे आहे असे स्पष्ट दिसत आहे. आत्महत्या करण्याआधी सासरच्या मंडळींनी वैष्णवी यांचा प्रचंड छळ केल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. हगवणे कुटुंबात फक्त वैष्णवी यांचाच छळ झाला नाही तर त्यांची मोठी सून मयुरी हगवणे यांचा देखील अशाच प्रकारे छळ करण्यात आला होता. मयुरी यांनी त्यावेळी महिला आयोगात धाव घेतली, मात्र त्याबाबत काही ठोस पाऊले उचलली नाहीत. आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का, असा आमचा प्रश्न असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. जर महिला आयोगाने मयुरी यांच्याच प्रकरणात कठोर पावले उचलली असती तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अन्यायकारक वागणूक वाढत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून हडपसरमध्येही एका महिलेने आत्महत्या केली आहे. दीपा प्रसाद पुजारी असं त्या महिलेचे नाव आहे. मध्यंतरी पुण्यात एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातही सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आले होते. हे प्रकरण ही प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. त्या विदेशी महिलेला न्याय मिळाला की नाही याबाबत काहीच थांगपत्ता नाही. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की राज्यात विविध ठिकाणी असे प्रकार घडत आहे पण महिला आयोग महिलांना न्याय देण्यात असमर्थ ठरत आहे असा थेट आरोप त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केला.