विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, माझ्यावर २४ दिवसांहून अधिक काळ अमानुष अत्याचार करण्यात आले. एटीएसचे अधिकारी म्हणत होते ही नावे घे, मग मारणं थांबवू.’ हे चौकशी नव्हे, तर राजकीय सूड होता. ( Sadhvi Pragya Singh Thakurs shocking allegations against Maharashtra ATS said they will stop killing only if the names of Modi Yogi and Mohan Bhagwat are mentioned)
यूपीए सरकारच्या काळात भगवा दहशतवाद हे कथानक रचण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप करताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या, तपासाच्या नावाखाली कठोर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची नावे घेण्यास भाग पाडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन संस्कृतीवर हा थेट हल्ला होता. मी सर्व अत्याचार आणि दबाव लेखी स्वरूपात सादर केला आहे. हे प्रकरण न्यायासाठी नव्हतं, तर भगव्या विचारधारेच्या विरोधात कट होता.
या आरोपांना काही साक्षीदारांच्या कोर्टात दिलेल्या जबाबांनीही पुष्टी दिली आहे. साक्षीदार मिलिंद जोशीराव यांनी न्यायालयात सांगितले की, एटीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी त्यांना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडले. माझ्यावर सात दिवस दबाव टाकण्यात आला. मी नावे घेण्यास नकार दिला तेव्हा मला त्रास दिला,” असे त्यांनी कोर्टात सांगितले.
माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंग यांनी त्यांना “मोहन भागवत यांना अटक करा” असे सांगितले होते.
मालेगाव स्फोटात सहा जणांचा मृत्यू व ९० हून अधिक लोक जखमी झाले होते. प्रकरणाची प्राथमिक चौकशी एटीएसने केली होती, मात्र नंतर ती NIA कडे सोपवण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात तपासातील गंभीर त्रुटी, छेडछाड केलेले पुरावे आणि बळजबरीने घेतलेले जबाब यांचा उल्लेख केला.
साध्वी प्रज्ञा यांनी हा निकाल केवळ वैयक्तिक न्याय नव्हे तर अध्यात्मिक व राष्ट्रवादी विचारधारेचा विजय असल्याचे म्हटले. “सत्याचा विजय झाला आहे. भारताच्या आत्म्याच्या विरोधात रचलेल्या कटाचा हा पराभव आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.