विशेष प्रतिनिधी
पुणे : सेल्समन तरुणाने अफरातफर करून नारायण पेठ येथील नीलकंठ ज्वेलर्स मधून
सुमारे साडेचार कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ( Salesman embezzles jewellery worth Rs 4.5 crore from Neelkanth Jewellers)
प्रतिक नगरकर (वय ३५, रा. सुतारदारा, कोथरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे नाव आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे (वय ३७, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डांगे हे नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅनेजर म्हणून कामास आहे.
नगरकर हा नारायण पेठ येथील नीलकंठ ज्वेलर्स या सोन्याच्या प्रसिद्ध दुकानात सेल्समन म्हणून कामास होता. त्याच्याकडे अंगठी, कॉईन आणि वेडणी च्या काउंटरची जबाबदारी होती. १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने अफरातफर करून तब्बल चार कोटी ५८ लाखांच्या सोन्याची चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकानाच्या मॅनेजरने विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलीस दुकानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करीत आहेत.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, नगरकर याने चार कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे ४ हजार ६८९ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची चोरी केली. यामध्ये २ हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेडणी (२ कोटी २१ लाख ६ हजार ५७९ रुपये) आणि २ हजार ४२६ ग्रॅम वजनाचे ९४ कॉईन्स (२ कोटी ३७ लाख ७ हजार १०० रुपये) याचा समावेश आहे.