विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपा प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमिता शाहा यांच्यासोबत बैठकही झाली असून प्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. (Sangram Thopte to leave Congresstalks of joining BJP)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम चिरंजीव आहेत. तीन वेळा भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. या मतदारसंघात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराणे त्यांचा पराभव केला.
थोपटे यांनी भोरमध्ये त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत कदाचीत त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. येत्या रविवारी ते काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊ शकतात. रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या 22 एप्रिल रोजी ते भाजपात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असेही सांगितले जात आहे.
संग्राम थोपटे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातही हाचलाची सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे पुण्याच्या जिल्हाध्यक्षांनी पुण्यातील काँग्रेस भवनात एक तातडीची बैठक बोलावली आहे. संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला तर काँग्रेसचे पुण्यात मोठे राजकीय नुकसान होऊ शकते. कारण संग्राम थोपटे यांचे वडील सहा वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिलेले आहेत. संग्राम थोपटे हेदेखील तीन वेळा भोरमधून आमदार राहिलेले आहेत.
संग्राम थोपटे यांचा भोर वेल्हा मुळशी हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या विजयात थोपटे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. आघाडीच्या राजकारणात जरी थोपटे शरद पवारांची साथ देत असले तरी शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे.