विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : खासदार संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण आमदारांच्या विरोधामुळे त्यांना ते जमले नाही, असा दावा उपमुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. ( Sanjay Raut also wanted to come to Guwahati with us butShahaji Bapu Patil claims)
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. या घटनाक्रमामुळे शिवसेना दोन गटांत विभागली गेली. या घटनेला 3 वर्षे लोटल्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी उपरोक्त दावा केला आहे.
शहाजी बापू पाटील पंढरपूरमध्ये बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांचा त्यांना विरोध होता. त्यांना येता आले नाही. यामुळेच राऊत आजही चिडचिड करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. सद्यस्थितीत ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राजकीय घडामोडी घडतील.
ठाकरे गट व मनसेच्या संभाव्य युतीवर पाटील म्हणाले, सध्या ठाकरे गट व मनसेच्या युतीचा विषय पुढे येत आहे. पण मनसेने काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंशी युती केली, तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल. मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचाही दावा केला.
शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. 2022 मध्ये ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओके मधी हाय’ या गावरान शैलीतील डायलॉगमुळे त्यांना सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळाली. शिवसेनेतील बंडखोरीवेळी ते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत फोनवर साधलेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.