विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे, असे ही प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.
( Santosh Deshmukh’s murder casts a shadow on humanity, Suresh Dhas angered )
बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला अमानुषपणे आणि क्रूरपणे करण्यात आली. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला होता. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या झाली. मागच्या अधिवेशनात त्यांनी सगळं क्रौर्य सांगितलं होतं. आता संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोनंतर सुरेश धस यांनी एक पोस्ट केली आहे.
आमदार धस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण आहे. ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
ही हैवानियत जिवंत राहिली तर कोणीही सुरक्षीत राहणार नाही. त्यासाठी आत्तापर्यंत मी ज्या तळमळीने आणि तडफडीने हे प्रकरण लाऊन धरले आहे त्याच पद्धतीने आरोपी फासावर जात नाहीत तो पर्यंत मी या प्रकरणी तसूभरही मागे हटणार नाही. आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावी यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे, असे ठाम आश्वासन आमदार सुरेश धस यांनी दिले आहे.