विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : दहशतवादी तंबूत लपलेल्यांना शोधून बाहेर काढत होते. वडिलांना कलमा म्हणण्यास सांगितले होते आणि जेव्हा ते म्हणू शकले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हातात बंदुका घेऊन, दहशतवादी तंबूत लपलेल्या लोकांना शोधत होते आणि मारत होते, असा भीषण प्रकार पहलगाम हल्ल्यात बळी गेलेले पुण्यातील पर्यटक संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिने सांगितला. ( Santosh Jagdales daughter narrated the horrific incident shot him because he could not pronounce the Kalima)
जगदाळे त्यांच्या कुटुंबासह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही होती. एक महिला नातेवाईकही होती. दहशतवाद्यांनी तिन्ही महिलांना सोडले. आसावरी जगदाळे यांनी फोनवरून एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाच जणांचा गट होतो. ज्यामध्ये माझे पालकही होते. आम्ही पहलगामजवळ बैसरन व्हॅलीमध्ये होतो. तेव्हा आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पोलिसांच्या गणवेशात असलेले काही लोक गोळ्या झाडत असल्याचे आम्ही पाहिले.
आम्ही सर्वजण जवळच्या तंबूत लपलो. इतर 6-7 जणही आले. गोळीबारापासून वाचण्यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, सुरुवातीला आम्हाला वाटले की, ही अतिरेकी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील चकमक आहे, असे वाटले. मग एक दहशतवादी आमच्या तंबूत आला आणि माझ्या वडिलांना बाहेर येण्यास सांगितले. तसेच पंतप्रधान मोदींसाठी काही चुकीचे शब्द वापरले. मग त्यांनी माझ्या वडिलांना कलमा)वाचायला सांगितले. जेव्हा ते वाचू शकला नाही, तेव्हा त्याच्या डोक्यात, कानामागे आणि पाठीमागे तीन गोळ्या झाडण्यात आल्या. माझे काका माझ्या शेजारी होते. दहशतवाद्यांनी त्यांनाही चार ते पाच गोळ्या झाडल्या.