विशेष प्रतिनिधी
पुणे : नीट २०२५ झालेल्या परिक्षेत पिंपरी-चिंचवडमधील एका विद्यार्थीनीच्या OMR शीट मध्ये खाडाखोड, बनावट सही अशा अनेक त्रुटी आहेत. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत (ANSWER KEY) मध्ये झालेल्या या फेरबदलामुळे विद्यार्थिनीचे पालक व विद्यार्थिनी अतिशय चिंताग्रस्त आहेत. नीट मधील या घोटाळ्याची गंभीर दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्यांनी ट्विटद्वारे NTA व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. ( Scam in NEET answer sheet Supriya Sule demands inquiry through tweet)
पिंपरी चिचंवड ,देहूरोड येथील मुस्कान वसीम शेख या विद्यार्थिनीने NEET २०२५ परीक्षा दिलेली होती. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आलेली ही परीक्षा तिच्या वैद्यकीय कारकिर्दीसाठी महत्त्वाची आहे. तिने त्यासाठी दोन वर्षे कठोर तयारी केली आहे.
सदर परीक्षेसंदर्भात ४ जून २०२५ रोजी. NTA ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर OMR शीट आणि उत्तरपत्रिका ( ANSWER KEY ) जारी केल्या. तथापि, जेव्हा मुस्कान शेख या विद्यार्थिनीने ओळखपत्रांचा वापर करून OMR शीट तपासण्यासाठी लॉग इन केले. तेव्हा असे आढळून आले की, दाखवलेली OMR शीट तिची नव्हती. हे पाहून त्या विद्यार्थिनीला धक्का बसला. कारण त्या OMR शीट मध्ये खाडाखोड, बनावट सही अशा अनेक त्रुटी आहेत .
NEET मध्ये मुस्कान चा हा दुसरा प्रयत्न होता. तिने वर्षभर दररोज १४-१४ तास अभ्यास व सराव केलेला आहे. तिला रँक मध्ये येण्याचा आत्मविश्वास आहे .
परंतु (NTA) कडून घेण्यात आलेल्या परीक्षेच्या ANSWER KEY मध्ये झालेल्या या फेरबदलामुळे विद्यार्थिनीचे पालक व विद्यार्थिनी अतिशय चिंताग्रस्त आहेत. या विद्यार्थिनीच्या गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या दोन्ही ओएमआर शीट्स मध्ये कमालीच्या विसंगती स्पष्टपणे दिसत आहेत .
परीक्षेसंदर्भात ४ जून २०२५ रोजी. NTA ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर OMR शीट आणि उत्तर पत्रिका ( ANSWER KEY ) जारी केल्या त्याच दिवशी विद्यार्थिनीने या समस्येबद्दल एनटीएला ईमेल केला आणि दररोज पाठपुरावा करत आहे, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
तसेच त्यांच्या हेल्पलाइनवर (०११६९२२७७००) नियमितपणे कॉल करत आहे. सुरुवातीला त्यांना सांगण्यात आले होते की दोन दिवसांत उत्तर दिले जाईल, परंतु अजूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुलीच्या पालकांनी अपना वतन संघटनेशी संपर्क साधला .
तसेच निटच्या पेपर संदर्भात तक्रार केल्यांनतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे मुस्कान शेख हिने रावेत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे . अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जे . पी नड्डा यांना मेलद्वारे या गंभीर प्रकारची माहिती दिली.
मुस्कान शेख या विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी अपना वतन संघटनेचे कार्यकर्ते सर्व स्तरावर पाठपुरावा करीत आहेत .त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे , राज्यसभेच्या खासदार फौजिया खान , मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना भेटून मुस्कान ला मदत करण्याची विंनती केली.
नीट मधील या घोटाळ्याची गंभीर दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलीय असून त्यांनी ट्विटद्वारे NTA व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच निटसारख्या केंद्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये असे प्रकार होत असतील तर प्रशासनाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे . तसेच राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनीही ट्विटद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे .
शीटवरील विद्यार्थिनीच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे असून व हस्ताक्षर दुसऱ्याचे आहे . विद्यार्थिनीच्या आईचे नाव ” नसीम शेख ” असताना , शीटवर ” असिफा शेख ” लिहलेले आहे ते जुळत नाही. रोल नंबर खाडाखोड करून बदललेले दिसत आहे . स्वाक्षरी बनावट किंवा कॉपी केलेली दिसते. शीटवरील बोटाचा ठसा जुळत नाही, अशा त्रुटी आढळल्या आहेत.