विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला भयानक दहशतवादी हल्ला हा एखाद्या स्वतंत्र कारवाया नसून, पॅलेस्टिनी संघटना हामास आणि पाकिस्तानच्या आश्रयातील दहशतवादी गटांमध्ये झालेल्या गुप्त युतीचा भाग होता, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी उघड केली आहे.
( Secret alliance between Hamas and Pakistanbacked terrorists before Pahalgam attackThreat of bloodshed in Delhi big conspiracy to break Kashmir exposed)
५ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शहीद साबिर स्टेडियम’ येथे आयोजित करण्यात आलेल्या “काश्मीर सॉलिडॅरिटी आणि हामास ऑपरेशन अल-अक्सा फ्लड परिषदेत” या कटाचा आराखडा तयार करण्यात आला होता.
या परिषदेत जैश-ए-मोहम्मदचा एक प्रमुख नेता खुलेआम म्हणाला, “काश्मीर आणि पॅलेस्टाईनचे लढवय्ये आता एकत्र लढणार आहेत. दिल्लीमध्ये रक्तपात होणार आणि काश्मीर भारतापासून तोडला जाईल.” या सभेला अंदाजे १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय दहशतवादी उपस्थित होते.
या मंचावर मसूद अझरचा भाऊ तल्हा सैफ, तसेच लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि इतर संघटनांचे वरिष्ठ नेते सहभागी होते. हामासकडून डॉ. खालिद अल-कदूमी, डॉ. नाझी जहिर, मुफ्ती अझम आणि बिलाल अलसल्लत यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, हामासने पहिल्यांदाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपल्या उपस्थितीची अधिकृत घोषणा याच परिषदेत केली.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कराने मिळून काश्मीरबाबत चुकीचे आणि भावनिक चित्र जगासमोर मांडण्याचा कट रचला आहे. त्यांनी पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाशी काश्मीरची तुलना करत तरुणांना भडकवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
या हल्ल्याच्या तयारीमध्ये JKUM, LeT, JuD या पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचा थेट सहभाग होता. या कारवाईसाठी अबू मूसा उर्फ मुसा काश्मीरी, सैफुल्ला कसुरी उर्फ सैफुल्ला खालिद, आणि रिजवान हनीफ यांनी सखोल नियोजन केले, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केली.
८ मिनिटांच्या एका प्रचारात्मक व्हिडीओमध्ये यासीन मलिक, मसरत आलम, सय्यद अली शाह गिलानी आणि बुरहान वानी यांना ‘आझादीचे प्रतीक’ म्हणून सादर करण्यात आले. “पाक की आजादी, काश्मीर की आजादी” असे घोषवाक्यही या व्हिडीओत वापरण्यात आले.
भारतीय सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे की, ही एक नव्या पद्धतीची ‘एकत्रित प्रतिकार चळवळ’ असून हामास व पाकिस्तानच्या मदतीने भारताविरुद्ध सुरू असलेली जागतिक प्रचार मोहीम आहे.