विशेष प्रतिनिधी
पुणे : सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठाला डिजिटल अटकेची भीती घालून २६ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Senior citizen duped of 26 lakh 50 thousand by fearing digital arrest)
याबाबत हरि अनंतराव पाटील (वय ६५, रा. खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी २२ जून ते ९ जुलै या दरम्यान फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅपवरून संवाद साधला. चोरट्यांनी ईडी तसेच सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच ज्येष्ठाच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादी यांची बनावट कागदपत्रे बनवून त्यांच्या आधार कार्डचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग तसेच धमकाविण्यासाठी केल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच अटकेची भीती घालून प्रकरण क्लियर करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना त्यांच्या बँक खात्यातील २६ लाख ५० हजार रुपये दिलेल्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी रकमेचे हस्तांतरण केले.
दरम्यान, आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार खराडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.