विशेष प्रतिनिधी
मुंबई : अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घालणारे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केले आहे.
( Senior Congress MLA Nana Patole suspended for creating ruckus in front of the Speakers chair)
भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांनी केलेल्या असंसदीय भाषेवरून फटकारले. यावेळी नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले असल्याचे दिसून आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली.
विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास झाला. यानंतर कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून आक्षेप घेतला. कृषिमंत्री वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करतात. तसेच आमदार, माजी भाजप मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर आक्षेपार्ह विधान केले होते. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली. याविरोधात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अस्लम शेख, ज्योती गायकवाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खुर्चीजवळ पोहोचले होते. अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित केले.
पाच मिनिटांनी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी ‘शेतकऱ्यांची माफी मागा’, ‘तानाशाही नही चलेगी’ अशा प्रकारच्या घोषणा सुरु केल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वारंवार समज दिल्यानंतरदेखील नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन वाद घालत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली. “एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे. पण थेट अध्यक्षांवर धावून जाणे अशोभनीय आहे. जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणे हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहत आहे. लोकं वर गेले, नाही असे नाही. पण अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे हे योग्य नाही. नाना पटोले स्वत: अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी असे वागणे योग्य नाही. नाना पटोलेंनी माफी मागायला हवी,”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.