विशेष प्रतिनिधी
पुणे : हिंदीची सक्ती नको. हिंदी भाषेचा द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही असे सांगत हिंदी भाषेच्या मुद्यावरून सुरु वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणसिस यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ( Sharad Pawar supports Devendra Fadnavis stand on Hindi issue says hatred is not in the interest of students )
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्र सरकारने राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले आहे. त्यामुळे त्या त्या राज्याच्या सरकारने विचार करून आपल्या राज्यात तीन कोणत्या भाषेचे शिक्षण लागू करायचे आहे, तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने राज्यात मराठी, इंग्रजी बरोबर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय दिला आहे. पण मराठी आणि इंग्रजी व्यतिरक्त पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नको, अशी मागणी करत मनसेसह इतर पक्षांनी हिंदीला विरोध केला आहे. भारतीय भाषेचा तिरस्कार करू नका, हिंदी ही देशात सुसंवादाची भाषा आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळी आहे. त्याला शरद पवार यांनीही पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, हिंदीची सक्ती करू नका. पण देशातील ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात. कोणी येत असेल हिंदी शिकत असेल तर नाही म्हणण्याचे कारण नाही. संबंध हिंदूस्थानची जी लोकसंख्या आहे, त्यातील जवळपास ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
हिंदी भाषेचा द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. विद्यार्थ्यांनी यासंबंधी निर्णय घ्यावा. पालक मार्गदर्शन करतील त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. कोणी येत असेल, शिकायचे असेल तर नाही म्हणण्याचे कारण नाही. ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, आता तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आम्ही एकत्र बसू. निवडणुकीला एकत्र सामोरे जाता येईल का यावर चर्चा आणि विचार करू. त्यानंतर एकत्रित निर्णय घेऊ. मुंबईत आम्हा सगळ्यात उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आहे. तिथे त्यांना विचारात घ्यावे लागेल, असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून काय निर्णय घेण्यात येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.