विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारी पदावरील व्यक्तीने सहकारातील निवडणूक लढविण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ( Sharad Pawar targets Ajit Pawar after crushing defeat in Malegaon factory)
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाले. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यावर बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले सरकारमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना केव्हाही असे केले नव्हते. कारण, सरकारी पदावरील माणूस कारखान्याचा प्रमुख असेल आणि विरोधकांना काही अडचण आली तर तो त्यांना न्याय कसा देईल?
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 4 पॅनेल मैदानात उतरले होते. त्यात अजित पवांचे निळकंठेश्वर, भाजप नेते चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वातील बळीराजा सहकार बचाव तथा शेतकरी समिती व अपक्षांच्या एका पॅनेलचा समावेश होता. त्यात अजित पवारांच्या पॅनेलची सरशी झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत अजित पवारांचा ब वर्ग गटातून विजय झाला आहे. त्यांना 101 पैकी 91 मते मिळाली.
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा पॅनेलला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात बळीराजा पॅनेलच्या उमेदवाराला फक्त 251 मतं मिळाली आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आतापर्यंत 7,722 मते मोजून झाली आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या पॅनेलचे उमेदवार राजू भोसले यांना फक्त 251 मते मिळाली आहेत. अजित पवारांचे उमेदवार रतन भोसले यांना 3926 मते मिळाली आहेत. तर विरोधी सहकार बचाव पॅनेलचे उमेदवार बापूराव भोसले 3,510 मते मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचा उमेदवार 416 मतांनी आघाडीवर आहे.