विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : सर्वपक्षीय शिष्टमंडळातून आंतरराष्ट्रीय दौरा करून आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली होती. पंतप्रधानांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
( Sharad Pawar thanks Prime Minister Narendra Modi for inquiring about his health)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यानंतर शरद पवार आज अहिल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर पत्रकारांनी शरद पवार यांना या संबंधीचा प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे अजित पवार यांच्याबरोबर महायुती म्हणजेच एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांची नरेंद्र मोदी यांनी केलेली विचारपूस आणि शरद पवार यांनी दिलेले उत्तर याबाबत आता चर्चा रंगली आहे.
हवामान खात्याकडून आलेले माहिती चांगली आहे. अजून पाऊस झाला नसला तरी चिंता करण्याचे कारण नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आणि अलीकडच्या काळातील अनुभव पाहता हवामान विभाग जे सांगते, घडते. शरद पवार यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी स्वतः नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचे सुचवले आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते हे पद सांभाळत आहेत. त्यामुळे याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. आता पुढील काळात बघूयात, अशा शब्दात शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या तयारीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.