विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या गाजत असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादळात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी विरोधात मोर्चा जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी या दोघा बंधूंना संयम आणि समंजसपणाचा सल्ला दिला आहे. देशात एक मोठा वर्ग हिंदी बोलतो, त्यामुळे हिंदीला साईडलाइन करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. ( Sharad Pawars advice to Thackeray brothers on Hindi opposition A sensible stance in the backdrop of the deteriorating political environment)
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना पहिलीपासून मराठी, इंग्रजी आणि हिंदी शिकणे बंधनकारक असेल. मात्र, या निर्णयाला मराठी भाषिक समूहांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र राज ठाकरे यांनी भेटीनंतरच गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून मराठी माणसाचा आहे. कोणताही पक्षाचा झेंडा नसेल. मी सर्व पक्षांशी संवाद साधणार आहे.
दुसरीकडे, ७ जुलै रोजी शिवसेना (ठाकरे गट) हुतात्म्यांना अभिवादन करून आंदोलन करणार आहे, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून, “विधिमंडळातील सर्व आयुध वापरून ठाकरेंचा पक्ष यासाठी प्रयत्नशील राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “माझ्या मते हा विरोध हा प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीविरोधात आहे. मी देखील मानतो की पाचवीपर्यंत हिंदी शिकवण्याचा हट्ट सरकारने टाळावा. लहान वयात विद्यार्थ्यांवर भाषेचा अतिरिक्त बोजा टाकू नये. मातृभाषा बाजूला जाऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे.”
त्यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे समर्थन करत सांगितले की, “त्यांनी जे काही म्हटले, ते चुकीचे नाही. त्यांनी हिंदी कुठे हवी आणि कुठे नको, याचे स्पष्टीकरण दिले आहे. जर ते मातृभाषेच्या संरक्षणासाठी एकत्र येत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे.”
राज ठाकरे ६ जुलैच्या मोर्चासाठी इतर पक्षांशी संवाद साधत असल्याच्या वृत्तावर शरद पवारांनी संयमित प्रतिसाद देत सांगितले की, “मला त्याबाबत माहिती नाही. कुठलाही एक पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे राज ठाकरे इतरांशी बोलू इच्छित असतील, तर त्यांना बोलू द्या. आम्ही त्यावर नंतर निर्णय घेऊ. पण आमची भूमिका नकारात्मक नाही.”