विशेष प्रतिनिधी
सोलापूर: अजित पवार गटात जायचे आहे पण मुहूर्त लागत नसला तरी शरद पवार गटाचे आमदार आता तुतारीऐवजी थेट घड्याळ वापरू लागले आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तर स्थानिक दैनिकांमध्ये जाहिरातीत पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘तुतारी’ ऐवजी अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर केला आहे. ( Sharad Pawars MLAs are in love with watches instead of trumpets Watches are also used in advertisements)
राजू खरे यांनी या जाहिरातीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरण्यात आले आहेत.
यापूर्वी देखील राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी स्थानिक दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या होत्या. राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले होते. यानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब झाली होती. त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांचे फोटो झळकले होते.
राजू खरे यांच्या पक्षविरोधी कृतींमुळे आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात शिस्त भंगाची कारवाई करणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.