विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे प्रदीर्घ आजारानंतर सोमवारी सकाळी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या शिबू सोरेन यांना पोटनिवडणुकीत हरल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ( Jharkhand Mukti Morcha founder Shibu Soren passes away a fighting leader who had to resign from the post of Chief Minister after losing the by-election)
शिबू सोरेन यांचे निधन: झारखंडच्या एका शिल्पकाराने घेतला जगाचा निरोप #शिबूसोरेन #झारखंड #आदिवासी #राजकारण #RIPShibuSoren #Jharkhand #TribalLeader #ShibuSoren pic.twitter.com/BhyrKwkCZL
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) August 4, 2025
दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुजी आपल्या सर्वांना सोडून निघून गेले अशा शब्दात झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. गंगाराम रुग्णालयात नेफ्रोद डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती.
शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आहेत. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते. तथापि, चिरुडीह हत्याकांडात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला .
शिबू सोरेन यांचा जन्म 11 जानेवारी 1944 रोजी सध्याच्या रामगड जिल्ह्यातील गोल ब्लॉकमधील नेमरा येथे झाला. गावातील शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दिशाम गुरु यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. ते फक्त 13 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची सावकारांनी हत्या केली. त्यानंतर शिबू सोरेन यांनी त्यांचे शिक्षण सोडून सावकारांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला.
2 मार्च 2005 रोजी शिबू सोरेन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना दहा दिवसांत राजीनामा द्यावा लागला. 27 ऑगस्ट 2008 रोजी शिबू सोरेन दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते आमदार नव्हते. या कारणास्तव, त्यांना निवडणूक जिंकून सहा महिन्यांत विधानसभेचे सदस्य व्हावे लागले. पाच महिन्यांनंतर 2009 मध्ये पोटनिवडणूक झाली. शिबूंना सुरक्षित जागेची आवश्यकता होती, पण त्यांच्यासाठी कोणीही जागा सोडण्यास तयार नव्हते. जे आमदार जागा सोडण्यास तयार होते, ती एक कठीण जागा होती. तामार विधानसभेत पोटनिवडणूक जाहीर झाली. युपीएने युतीच्या वतीने शिबू यांना उमेदवारी दिली, परंतु शिबू तेथून निवडणूक लढवू इच्छित नव्हते.झारखंड पक्षाचे राजा पीटर त्यांचे विरोधक म्हणून रिंगणात होते. 8 जानेवारी 2009 रोजी निकाल आला तेव्हा मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी पोटनिवडणूक सुमारे 9 हजार मतांनी गमावली. शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
तीन टर्ममध्ये, शिबू सोरेन यांना फक्त 10 महिने 10 दिवस राज्याची जबाबदारी घेण्याची संधी मिळाली. 2 मार्च 2005रोजी शिबू सोरेन पहिल्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले. 2 मार्च ते 12 मार्च या काळात ते फक्त 10 दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले. यानंतर 28 ऑगस्ट 2008 रोजी शिबू सोरेन दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांना पाच महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळाली. 18 जानेवारी 2009 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिसऱ्यांदा 30 डिसेंबर 2009 रोजी शिबू सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले. यावेळी पुन्हा त्यांना फक्त पाच महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळाली. त्यांनी 31 मे 2009 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.