विशेष प्रतिनिधी
नांदेड : विरोधी पक्षाकडून भारतीय जनता पक्षावार पैसे वाटल्याचे आरोप झाले. पण भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. भाजपने पैसे वाटलं असतं तर आपण किमान 50 हजार मतांनी निवडून आलो असतो असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपवर हा थेट आरोप केला आहे. नुकतेचनांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले
यावेळी त्यांनी भाजपामध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. माझ्याविरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले, असा आरोप केला.
“विधानसभा निवडणुकीत महायुतीत काय त्रास झाला हे सगळ्यांना माहीत आहे. भाजपामध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. माझ्याविरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले. मला 50 हजारांची लीड मिळणे अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजारांची लीड मिळाली. त्यामुळे माझा निसटता विजय झाला”, अशी खंत बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली.
माझं मतदारसंघात मी चांगलं काम केल्याने जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. महायुती म्हणून भाजपाने सहकार्य करणे आवश्यक होते. परंतु तसे विधानसभा निवडणुकीत झाले नाही असे सांगून बालाजी कल्याणकर म्हणाले, नांदेड उत्तरच्या जनतेने मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आभार मानतो. 50 वर्षात झाला नाही. तेवढा विकास नांदेड उत्तर मतदारसंघात शिंदेसाहेबांमुळे झाला आहे. जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला, तेव्हा आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी होतो. साहेबांनी जो मला शब्द दिला तो साहेब पूर्ण करतील हे मी 100% सांगतो.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. यानंतर एका सत्कार सभारंभावेळी बोलताना कल्याणकर यांनी मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली होती. मंत्रीपद मिळाली नसल्यामुळे ते सध्या नाराज आहेत.