विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिंदे गटाने खास ‘धंगेकर पॅटर्न’ राबवत एक नवीन पद निर्माण केले आहे. ‘महानगर प्रमुख’ या नव्या पदाच्या माध्यमातून धंगेकर यांना पुन्हा एकदा सक्रिय राजकीय भूमिकेत आणण्यात आले आहे. ( Shiv Sena Shinde groups Dhangekar pattern political rehabilitation by creating the post of metropolitan chief)
रवींद्र धंगेकर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवून चर्चेत झळकले होते. त्यांच्या प्रभावी प्रचारशैलीमुळे त्यांचा ‘धंगेकर पॅटर्न’ हा शब्दप्रयोग महाविकास आघाडीमध्ये गाजू लागला होता. मात्र, 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर धंगेकरांनी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी ‘हात’ सोडला आणि ‘धनुष्यबाण’ स्वीकारला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांपर्यंत त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पुणे शहरासाठी नव्याने ‘महानगर प्रमुख’ हे पद निर्माण करून ती जबाबदारी धंगेकरांच्या हाती दिली. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने याबाबतचे पत्र जाहीर करण्यात आले.
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळेच सगळ्या पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून, शिंदे गटानेही पुण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी धंगेकर यांच्यावर भरवसा ठेवला आहे.
धंगेकर यांचा जनसंपर्क आणि प्रतिमा शिंदे गटासाठी आगामी महापालिका निवडणुकांत उपयोगी ठरू शकते. अधिकृत पत्रकात ‘शहराध्यक्ष’ असा उल्लेख असला तरी पक्षाने स्पष्ट केले आहे की, नाना भानगिरे हेच पुण्याचे शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष राहणार असून, धंगेकर यांना वेगळ्या स्वरूपात ‘महानगर प्रमुख’ अशी स्वतंत्र भूमिका देण्यात आली आहे.
आपण कोणत्याही पदासाठी नव्हे, तर एकनाथ शिंदे यांच्या विकासाच्या अजेंडावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला, असे स्पष्टीकरण स्वतः धंगेकरांनी दिले होते. मात्र आता त्यांच्या पुनर्वसनाच्या या हालचालींमुळे, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.