विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील दादर येथील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. दादर पोलिसांनी या शिक्षिके विरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हाही नोंदवला आहे.
( Shocking 40-year-old teacher rapes 11th grade student)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लैंगिक अत्याचार गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू होता. या काळात, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले. विद्यार्थ्याने गप्प राहावे, यासाठी ती त्याला नैराश्यविरोधी औषधंही देत होती. विद्यार्थी अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. परीक्षा संपल्यानंतर, आरोपी शिक्षिकेने आपल्या नोकराला विद्यार्थ्याला भेटण्यासाठी पाठवले. यावेळी विद्यार्थ्याने आपल्या पालकांना या भयंकर अनुभवाची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षिकेला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये, तसेच विमानतळाजवळील लॉजमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होती. हे संबंध प्रस्थापित करण्याआधी ती अनेकदा त्याला मद्य पाजत असे, असे पोलिसांनी सांगितले. सध्या ही शिक्षिका पोलिस कोठडीत असून तपास सुरू आहे.
हे शोषण सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल दिसून येऊ लागला. पालकांनी त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने घडलेल्या सर्व अत्याचारांची माहिती दिली. मात्र, विद्यार्थ्याचे शालेय शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही महिनेच उरले असल्यामुळे कुटुंबीयांनी त्या वेळी गुप्तता बाळगण्याचा निर्णय घेतला. त्यांना आशा होती की, शिक्षिका त्याला सोडून देईल.
पोलिसांनी शिक्षिकेच्या मोबाइलमधील चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत.