विशेष प्रतिनिधी
पुणे : दौंड तालुक्यातील चौफुला येथील रेणुका कला केंद्रात गाणी वाजवण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार पार्टनर आमदाराच्या जवळचा असल्याने हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ( Shooting at Chaufula Art Center over dispute over playing songs allegations that the case is being suppressed)
दौंड तालुक्यातील चौफुलाच्या पुढे रेणुका कलाकेंद्र आहे. कलाकेंद्रात काल रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. कलाकेंद्रात दोन गटात वादावादी झाली. लावणी वाजवायची कि डीजेवरची गाणी वाजवायची यावरून वाद झाला होता. त्यावेळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तो व्यक्ती आमदाराच्या जवळचा असल्याचे कळते आहे. पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरु असल्याचे सांगितले आहे. गोळीबार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ती व्यक्ती एका आमदाराच्या जवळची असल्याने हे प्रकरण दडपले जात असल्याचे आरोपही होऊ लागला आहे. २४ तास उलटूनही पोलिसांना या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाही. कला केंद्राच्या मालकांना विचारले असता त्यांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले आहे. आमच्याकडे हा प्रकार हा घडला नाही. पोलिसांनी चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत म्हटले आहे की, दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’
कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत_कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे.