विशेष प्रतिनिधी
पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “अवलिया” श्री शंकर महाराज चित्रपटाचे टीज़र पोस्टर लॉन्च करण्यात आले. ( Shri Shankar Maharajs biopic now on the silver screen)
श्री शंकर महाराज हे आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. त्यांची समाधी ही सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत- सिद्धीच्या मागे लागू नका… त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी कधीच उपाधी लावल्या नाहीत. “अवलिया” श्री शंकर महाराज या आगामी चित्रपटातून त्यांचा जीवनपट आपल्या भेटीस येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा शंकर महाराज समाधी सोहळ्याच्या दिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक् चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले.
जयशंकर प्रॉडक्शन या निर्मितिसंस्थे अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून भाजपाचे राजेंद्रआबा शिळीमकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शशि चंद्रकांत खंदारे यांचे असून याआधी त्यांनी अनेक महोत्सवात गौरवलेल्या “जिप्सी” या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.
‘अवलिया’ हा चित्रपट श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्यावर असणार आहे. १८०० च्या सुमारास श्री सद्गुरू शंकर महाराज प्रकट झाले ते १९४७ मध्ये त्यांनी समाधी घेतली. या १५० वर्षाच्या कालखंडात त्यांनी असंख्य लीला केल्या, अगणित भक्तांना सन्मार्ग दाखवले, त्यांचा उद्धार केला. अशा आधुनिक काळातील सत्पुरुषावर सदर चित्रपट असणार आहे.
श्री सद्गुरू शंकर महाराजांवर आधारित असलेल्या बहुतांश कलाकृती मध्ये केवळ चमत्कारांवर भर देण्यात आला आहे. महाराज हे चमत्काराच्या ही खूप पुढे आहेत. त्यांनी चमत्कार हे केवळ भक्तांचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी केले आहेत. शंकर महाराजांनी असंख्य लीला केल्या त्याच बरोबर त्यांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक ही होता, हे विसरून चालणार नाही. महाराजांनी केलेल्या अगाध लीलांबरोबरच महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून चित्रपटातील कलाकरांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे लेखक दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांनी सांगितले.