विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पापांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी मौन पाळण्यात येणार आहे.
पुण्यातील सामाजिक संस्थांनी १३ फेब्रुवारी २०१० साली दहशतवाद्यांनी पुण्यातील जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला होता तर ५६ जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड कृत्यात मृत झालेल्या लोकांना आम्ही प्रतिवर्षी आदरांजली अर्पण करत असतो. या वर्षी या हल्याला १५ वर्ष पूर्ण होत आहेत. गेली १४ वर्षे अविरतपणे ‘मेरे अपने’ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रुणवाल, डॉ. मानसी जाधव, जर्मन बेकरीच्या स्नेहल खरोसे यांच्यावतीने हल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही १३ फेब्रुवारीला त्या १७ जणांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या वर्षी आम्ही अदरांजली सोबतच सकाळी १० ते सांयकाळी ८ वाजेपर्यंत मौन पाळणार आहोत.
कोरेगाव पार्क भागामध्ये असलेल्या जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेला यंदा १५ वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्कमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आदी मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहणार आहेत. संध्याकाळी सव्वासात वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी केले आहे.
मौन असल्यामुळे कार्यक्रमात कोणीही भाषण करणार नाही, साउंड सिस्टीम सुद्धा लावण्यात येणार नाही. कार्यक्रमासाठी लागणारा स्टेज फक्त आम्ही उभा करणार आहोत. त्यामुळे समस्त पुणेकरांनी येत्या १३ फेब्रुवारीला जर्मन बेकरी, कोरेगाव पार्क येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळेत उपस्थित राहून या दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त करावा, असे आवाहन रुणवाल, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, दलित सेना संस्थेचे अध्यक्ष सुनील यादव, डॉ. मानसी जाधव, जर्मन बेकरीच्या स्नेहल खरोसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.