विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून हिंदी भाषेबाबतची भूमिका समजून घ्यावी असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ( Sit with Devendra Fadnavis and understand the subjectChandrakant Patil advises Raj Thackeray)
इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी विषय लागू करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला राज ठाकरे यांनी कठोर विरोध केल आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे खूप चांगले नेते आहेत. ते खूप गोष्टी परखडपणे मांडतात. पण या विषयात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून ही भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे.
पाटील म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती केली आहे, हे समज चुकीचा आहे. लोकांमध्ये हा गैरसमज आहे. अशी एखादी तिसरी भाषा देशभरात जाण्यासाठी, देशभरातील गोष्टी समजून घेण्यासाठी उपयोगी असेल तर विरोध करण्याचं कारण नाही. त्यामुळे सक्तीचा शब्द कुठून आला हेच मला समजत नाही.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या धोरणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी. पण महाराष्ट्रात जेंव्हा अशी सक्ती आली तेंव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
हिंदुसक्तीच्या विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आधी हिंदी अनिवार्य केली होती. मात्र अनिवार्यता काढून टाकली आहे. आता आपण यामध्ये कोणतीही तिसरी भाषा शिकता येईल. तीन भाषेचे सूत्र नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घेतले आहे. यामध्ये मातृभाषा अनिवार्य आहे. त्यासोबत आणखी दोन भारतीय भाषा शिकता येतील, यामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय आहे, यापैकी आपल्याकडे इंग्रजी निवडतात. आपण सर्वजण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला ज्ञानभाषा करण्याचा मार्ग खुला केला आहे. आता इंजिनियअरिंग, एमबीए मराठीमध्ये शिकवता येईल.