विशेष प्रतिनिधी
सोलापूर :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ‘श्री सिद्धेश्वर विकास पॅनल’ने प्रचंड वर्चस्व गाजवत १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला आहे. तर माजी सहकार मंत्री व भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या ‘श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल’ला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
( Solapur Agricultural Produce Market Committee Election Sachin Kalyanshettys panel wins big blow to Subhash Deshmukh)
विविध कार्यकारी सोसायटी गटातील सर्व ११ जागांवर कल्याणशेट्टी यांच्या पॅनलचा झेंडा फडकल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने निर्णायक बाजी मारली. मात्र ग्रामपंचायत गटात सुभाष देशमुख यांच्या पॅनलने ४ पैकी ३ जागा जिंकत काही प्रमाणात अस्तित्व दाखवले.
यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा विजय अधिक भक्कम झाला.
माजी आमदार दिलीप माने म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवली. जवळपास ७५ टक्के मते आम्ही मिळवली आहेत. ग्रामपंचायत पदांमध्ये कमी पडल्याचे आम्ही लक्षात घेऊन त्यावर सुधारणा करू. बाजार समितीचा कारभार एकोप्याने चालवून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू.”
ते पुढे म्हणाले, “सभापती निवडीबाबत निर्णय आ. कल्याणशेट्टी यांच्यासोबत आणि मुख्यमंत्री ठरवतील तसे घेतला जाईल.”
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले, “आम्हाला त्यांच्या तुलनेत तीनपट मते मिळाली. १५ जागांवर विजय मिळवून शेतकरी बांधवांनी आमच्यावर विश्वास दाखवला. जिथे आम्ही कमी पडलो, तिथे आत्मपरीक्षण करू.”
सभापती निवडीबाबत त्यांनी स्पष्ट केले, “कोणतीही चुरस नाही, मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांनुमते मान्य केला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “राजकारणात हार-जीत होतच असते. विरोधी पॅनलमधील विजयी उमेदवारांनाही विश्वासात घेऊन आम्ही एकत्र काम करू. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती म्हणून घडवू.”