विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडविले. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
( Speeding car kills 12 MPSC students CM promises to cover treatment expenses)
शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही घटना घडली. चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या 12 विद्यार्थ्यांना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने उडवलं. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. तर नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने दारू प्यायल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींमध्ये काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते. जखमींमध्ये तीन मुली आहेत. . या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासणे उपस्थित राहिले. हेमंत रासणे यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. या विद्यार्थांना जी काही मदत लागेत ती करू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
या अपघातात जखमी झालेले काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. पण त्यांची सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसंदर्भात काही वेगळा मार्ग निघू शकतो का यावरही विचार करण्यात येणार आहे.