विशेष प्रतिनिधी
पुणे : गोवा येथून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. हवेत असताना विमानाच्या एका खिडकीवरील कॉस्मेटिक विंडो फ्रेम अचानक सैल होऊन निसटली. यामुळे काही क्षण प्रवाशांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, स्पाइसजेटने त्वरित स्पष्टीकरण देत या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झाला झालेला नसल्याचे सांगितले.
( SpiceJet plane window frame falls off while in the airpanic among passengers)
विमान कंपनीने स्पष्ट केले की, “निसटलेला घटक हा केवळ एक नॉन-स्ट्रक्चरल ट्रिम पार्ट होता, जो खिडकीच्या आतील बाजूस सावलीसाठी बसवण्यात येतो. त्यामुळे विमानाच्या संरचनेवर किंवा हवेच्या दाब व्यवस्थापनावर (cabin pressurisation) याचा कोणताही परिणाम झाला नाही.” कंपनीने सांगितले की, लँडिंगनंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ही फ्रेम दुरुस्त केली असून, ही एक सामान्य देखभाल प्रक्रिया आहे.
विमानातील काही प्रवाशांनी सांगितले की, उड्डाण सुरु असताना अचानक खिडकीच्या भागातून आवाज ऐकू आला. त्या भागातून बाहेरील प्रकाश दिसू लागल्यामुळे काही प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, विमानातील क्रू सदस्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत शांतता राखली आणि प्रवाशांना धीर दिला.
विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची नोंद घेतली असून, आवश्यकतेनुसार अधिक तपास केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. DGCAने यापूर्वीही विमान कंपन्यांना त्यांच्या देखभाल पद्धतींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांत देशातील विविध विमान कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या तांत्रिक त्रुटी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि इतर काही कंपन्यांच्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातापासून नागरिकांमध्ये विमान प्रवासासंबंधी सुरक्षा बाबतीत चिंता वाढली आहे.
जरी ही फ्रेम फक्त “कॉस्मेटिक” होती आणि प्रवाशांच्या जीवितास धोका नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी देखभालीसंबंधी अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याने विमान कंपन्यांच्या देखभाल कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आणि DGCAने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही.