विशेष प्रतिनिधी
पुरी :पुरीत रविवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेने जगन्नाथ रथयात्रेच्या आनंदात काळोख पसरला. ओडिशातील पुरी येथे सुरु असलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, नंदीघोष रथाजवळ प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ( Stampede during Jagannath Rath Yatra in Puri Three devotees die six injured)
ही दुर्घटना रविवारी पहाटे साधारणतः ४ वाजण्याच्या सुमारास घडली. भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ त्यांच्या मावशीच्या मंदिराकडे, म्हणजेच गुंडीचा मंदिरात पोहोचत असताना मंदिराच्या समोरच ही चेंगराचेंगरी झाली. बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ श्रद्धाबली येथे आधीच पोहोचले होते.
मृतांमध्ये बसंती साहू (३६), प्रेम कांती मोहंती (७८) आणि प्रभात दास यांचा समावेश असून, त्यांच्या पार्थिवदेहांना पुरी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे. जखमी भाविकांवरही तिथेच उपचार सुरु आहेत.
दुर्घटनेनंतर काही भाविकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून, घटनेच्या वेळी त्या ठिकाणी पुरेशी पोलिस यंत्रणा नव्हती, असे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीकाही होत आहे.
शुक्रवारी दुपारी ४ वाजता भगवान जगन्नाथाची पारंपरिक रथयात्रा पुरीत सुरू झाली. प्रथम भगवान बलभद्राचा ‘तलध्वज’ रथ, त्यानंतर देवी सुभद्राचा ‘दर्पदलन’ आणि शेवटी भगवान जगन्नाथांचा ‘नंदीघोष’ रथ ओढण्यात आला.
पहिल्या दिवशी भगवान बलभद्राचा रथ सुमारे २०० मीटर ओढण्यात आला. उर्वरित रथही काही अंतर पुढे नेण्यात आले. शनिवारी सकाळी १० वाजता रथयात्रा पुन्हा सुरू करण्यात आली.
भगवान बलभद्रांचा रथ सकाळी ११.२० वाजता, देवी सुभद्राचा दुपारी १२.२० वाजता श्रद्धाबली येथे पोहोचला. त्यानंतर, भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ दुपारी १.११ वाजता गुंडीचा मंदिरात पोहोचत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
राज्य सरकार आणि मंदिर प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुढील काळात कडक उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.