विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान म्हणजे महाराष्ट्राचं गौरवशाली यश. या यशाच्या जोडीला किल्ल्यांचे जतन, संवर्धन व अतिक्रमणमुक्ती हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची तयारी असल्याचे उत्तर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. ( State government ready for world heritage of forts Ashish Shelars reply to Raj Thackeray)
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करत, सरकारने अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती. याला उत्तर देताना राज्य सरकारच्या तयारीचे, नियोजनाचे आणि कृतीचे सविस्तर उत्तर शेलार यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिले आहे.
“युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळणे ही एक दीर्घकालीन, तपशीलवार आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. यात कायदेशीर संरक्षण, व्यवस्थापन आराखडा, संवर्धनाची योजना, निधीची तरतूद, शास्त्रीय देखभाल – अशा अनेक मुद्द्यांची कसून पाहणी होते. आणि या सर्व गोष्टी सरकारने पूर्ण केल्या आहेत,” असे शेलार म्हणाले.
राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर 31 जानेवारी 2025 पर्यंत अतिक्रमणांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. किल्ल्यांच्या रक्षणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समित्या, आणि लवकरच प्रत्येक किल्ल्यासाठी स्वतंत्र समित्या देखील कार्यरत होतील, असे सांगून शेलार म्हणाले, सर्व १२ किल्ले केंद्र अथवा राज्य संरक्षित स्मारकांमध्ये मोडतात. त्यांचा शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि संवर्धन आराखडा तयार करण्यात आला आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र निर्णय शासनाने घेतले आहेत. संवर्धनासाठी निधीची तरतूद आणि लांब पल्ल्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.
देशभरातून आलेल्या सात प्रस्तावांपैकी महाराष्ट्राच्या “मराठा लष्करी भूप्रदेश” या प्रस्तावाची निवड स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली ते पॅरिस पर्यंत या मोहिमेचा आढावा घेऊन विशेष पाठपुरावा केला, असे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या आनंदाचे आणि मुद्द्यांचे स्वागत करत, आशिष शेलार म्हणाले की, “आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार जागरूक आहे. आमचा विभाग आणि संपूर्ण टीम हे काम संपूर्ण तांत्रिक आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी सज्ज आहे. हा आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे.”