विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपाची राज्यसभेत ताकद वाढली असून एप्रिल २०२२ नंतर पहिल्यांदा शंभरचा आकडा पार केला आहे. या सदस्यांमध्ये नुकत्याच नवनिर्वाचित झालेल्या राष्ट्रपती नियुक्त तीन सदस्यांचा समावेश आहे. (Strength increased, BJP again reached the hundred mark in Rajya Sabha)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ४ सदस्यांची नियुक्ती राज्यसभेत खासदार म्हणून केली आहे. ज्यात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम , माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर आणि राजकीय इतिहासकार मिनाक्षी जैन यांचा समावेश आहे. मागील महिन्यात शपथ घेणाऱ्या या ४ सदस्यांपैकी ३ सदस्य भाजपाचे आहेत. तीन नव्या सदस्यांमुळे राज्यसभेत भाजपाची सदस्य संख्या १०२ इतकी झाली आहे.
याआधी ३१ मार्च २०२२ रोजी १३ राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. त्यावेळी भाजपा खासदारांची संख्या ९७ वरून १०१ इतकी झाली होती. काँग्रेसला १९८८ आणि १९९० मध्ये हे यश गाठता आले होते जेव्हा त्यांची सदस्य संख्या १०० पेक्षा अधिक झाली होती.
राज्यसभेत सध्या २४० खासदार आहेत. ज्यात १२ सदस्य नामनिर्देशित आहेत. ५ जागा अद्याप खाली आहेत ज्यात १२ नामनिर्देशित खासदारांपैकी ५ जणांचा समावेश आहे. एकट्या भाजपाकडे १०२ खासदार आहेत. या सभागृहात बहुमतासाठी १२१ खासदारांपेक्षा जास्त सदस्य भाजपा सरकारकडे आहेत.
नवनियुक्त खासदा उज्ज्वल निकम हे एक विशेष सरकारी वकील आहेत. त्यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहचवण्याचं काम केले. त्याशिवाय असे अनेक खटले त्यांनी लढले आहेत. २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. २०२४ ची लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लढली होती. हर्षवर्धन श्रृगंला २०२० ते २०२२ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते. २०२३ च्या जी २० शिखर संमेलनात त्यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम केले. अमेरिकेत भारताचे राजदूत आणि बांगलादेशात उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम सांभाळले होते. सी सदानंदन मास्टर हे केरळमधील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक आहेत. १९९४ मध्ये त्यांचे पाय कापण्यात आले होते. भाजपामध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्यावर संतापलेल्या सीपीएम कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता असा आरोप त्यांनी केला होता.