विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी रहदारी, साधू-संत आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक बाह्यवळण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला आणि प्रशासनाला विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. ( Submit the proposal for the Nashik bypass project to the cabinet immediately Chief Minister directs)
मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त आणि पालक सचिव यांना येत्या दहा दिवसांत प्राधान्याने हाती घ्यावयाच्या रस्त्यांचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करण्यास सांगितले. त्यांनी बाह्यवळण मार्ग, परिक्रमा मार्ग आणि अस्तित्वातील रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याचा आदेश दिला. याशिवाय, नाशिक विमानतळ, समृद्धी महामार्ग आणि इतर प्रमुख मार्गांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील आवश्यक रस्त्यांची कामे महापालिकेच्या नगरनियोजन विभागामार्फत हाती घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त मुंबई, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे अशा विविध भागांतून नाशिकमध्ये भाविक येणार असल्याने, त्या मार्गावरील रस्त्यांचे बळकटीकरण तसेच वाहनतळ उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाविकांना उत्तम वाहतूक सेवा मिळावी यासाठी ई-बस एकात्मिक वाहतूक सुविधेचा प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी देशातील शहरे ही विकास केंद्रे बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘शहरी आव्हान निधी’ या योजनेचा लाभ घेत नाशिकच्या वाहतूक समस्या सोडवाव्यात, अशी सूचना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत नागरी जीवनमानात सुधारणा करणे हा उद्देश असून, त्यात नाशिकचा समावेश करून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर करावा, असे ते म्हणाले.
या प्रकल्पाअंतर्गत एकूण १३७ किलोमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रीनफील्ड अलाईनमेंटद्वारे उभारण्यात येणार आहे. जुन्या नाशिक-मुंबई महामार्गापासून पुढील ६९ किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येणार असून यातील ४१ किलोमीटरचा रस्ता महापालिका हद्दीबाहेरून जाणार आहे. या रस्त्यांसाठी सुमारे ४० गावांमधून सुमारे ५०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीस आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.