विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सोमवारीच आपला पदभार सांभाळणार आहेत.
( Sujata Saunik retiredRajesh Kumar Meena the new Chief Secretary of the state)
राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.
1988 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले राजेशकुमार मीना हे ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट या जेमतेम दोन महिन्यांचाच कालावधी असणार आहे. पण, दरम्यानच्या काळात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे राजेशकुमार मीना यांच्याबाबतही असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्याचे नवे मुख्य सचिव कोण असावेत, याचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राजेशकुमार मीना हे प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असून त्यांना कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. सध्या ते महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सेवा ज्येष्ठतेचा निकष पाळून राजेशकुमार मीना यांच्या नावालाच हिरवा कंदील दाखवला आहे.