विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील कामे आघाडी सरकारच्या कार्यकाळात ठेकेदार नेमणुकीपर्यंत पार पडली असून, या सर्व ठेकेदारांचे आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके यांच्याशी निकटचे संबंध आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ( Sujay Vikhe alleges that Jaljeevans contractors have links with Rohit Pawar)
नुकतीच जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी व तपासणी केली. मात्र यावर प्रतिक्रिया देताना डॉ. विखे यांनी थेट रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.
“कर्जत-जामखेडमधील बहुतेक ठेकेदार हे रोहित पवार यांच्याशी संबंधित आहेत. पारनेरमध्येही माजी आमदारांच्या निकटवर्तीय ठेकेदारांची निवड करण्यात आली होती. सरकार बदलल्यामुळे आता आरोपांचं सत्र सुरू झालं आहे,” असे सुजय विखे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “वर्क ऑर्डर आघाडी सरकारच्या काळात निघाल्या. मात्र आता आम्हाला त्यांच्या निवडलेल्या लोकांकडूनच काम करून घ्यावी लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आता नुकसान झाल्याने बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत.”