विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2010च्या घोटाळ्यात अडकल्यावर माजी मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आले. तब्बल १४ वर्षांनंतर कलमाडी याना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे.( Suresh Kalmadi gets clean chit after 14 years in Commonwealth Games scam)
संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊस अव्हेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे या 14 वर्षे जुन्या कथित प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरेश कलमाडी आणि इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातील सर्व आरोपींना कोर्टाकडून क्लीन चिट दिल्याने आता हा खटला निकाली निघाला आहे. या प्रकरणात आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी आणि सरचिटणीस ललित भानोत यांच्यासह अनेक आरोपी होते.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात हा कथित घोटाळा उघडकीस आला होता. स्विस कंपनीला चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्यामुळे सुमारे 90 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला होता. यानंतर, कलमाडी यांना 24 एप्रिल 2011 रोजी अटक करण्यात आली. नंतर नऊ महिन्यांनी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कॉमनवेल्थ गेम्सशी संबंधित कामाचे कंत्राट गेम्स वर्कफोर्स सर्व्हिसेस (GWS) आणि गेम्स प्लॅनिंग, प्रोजेक्ट अँड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस (GPPRMS) यांना देण्यात आले होते. आरोपींनी जाणूनबुजून आणि चुकीच्या पद्धतीने ईकेएस आणि अर्न्स्ट अँड यंग यांच्या संघाला दोन कंत्राटे देऊन अनुचित आर्थिक फायदा मिळवून दिला होता. पण नंतर सीबीआयने जानेवारी 2014मध्ये ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कोणतेही खटले चालवण्यायोग्य पुरावे सापडले नाहीत, असे सीबीआयने या रिपोर्टमध्ये नमूद केले होते.
ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणाच्या आधारे मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. त्याचाच क्लोजर रिपोर्ट ईडीने राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केला होता. पीएमएलएच्या कलम 3 (मनी लाँड्रिंग) अंतर्गत आरोप सिद्ध करण्यात ईडीला यश आलेले नाही. ईडीने सखोल चौकशी करूनही कोणतेही पुरावे सापडले नसल्याने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यात येत असल्याचे विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले.