विशेष प्रतिनिधी
बीड: बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. कासले यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. ( Suspended police sub-inspector Ranjit Kasle from Beed arrested in Delhi)
गेल्या काही दिवसांत रणजित कासले यांनी व्हिडिओ शेअर करत अनेक खळबळजनक दावे केले होते. धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप त्यांनी केले होते. तसेच आपल्याला निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी वाल्मीक कराडच्या कंपनीकडून 10 लाख रुपये दिले होते, असेही कासले यांनी सांगितले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराची गाडी मी कोविड काळात पकडली होती. त्या गाडीत कोट्यवधीचे ड्रग्ज सापडले होते. हा आमदार सध्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वीच रणजित कासले यांनी केला होता.
बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर त्याने एका व्हिडिओद्वारे बीड कारागृहात वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता. वाल्मीक कराडला तुरुंगात स्पेशल चहा, जेवणात चांगल्या पोळ्या दिल्या जातात. विशेषतः कराड स्वतःसह इतर कैद्यांच्या नावाने तुरुंगातील कँटीनमध्ये दरमहा 25 हजार रुपयांची खरेदी करतो. त्याला पांघरण्यासाठी 3-3 ब्लँकेट पुरवले जात आहेत. त्याचा तो गादीसारखा वापर करतो. त्याला घरच्या जेवणासह चिकन व फरसाणही पुरवले जाते, असे रणजित कासले यांनी म्हटले होते.
रणजित कासले यांनी आपल्या व्हिडिओत धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला 5 वर्षांच्या आत तुरुंगातून सोडवण्याची ग्वाही दिल्याचाही आरोप केला होता. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे. त्याला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आहे. त्याच्यावर मकोकाही दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्याचा बाहेर येण्याचा मार्ग बिकट झाला आहे. पण धनंजय मुंडे यांनी त्याला देशमुख हत्या प्रकरणात त्याची 5 वर्षांच्या आत सुटका करण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी त्यांनी त्याची तुरुंगात सगळी व्यवस्था केली आहे, असे कासले यांनी म्हटले होते.
अंबाजोगाई येथील एका व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये घेतले पण वारंवार मागणी करून उसने घेतलेले पैसे परत केले नाहीत, असा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या उपचारासाठी म्हणून हे पैसे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. रणजित कासले जेव्हा अंबाजोगाई येथे कार्यरत होते, तेव्हा त्यांची सुधीर चौधरी नामक व्यावसायिकाशी मैत्री होती. या मैत्रीतून रणजित कासले यांनी आईच्या उपचारासाठी म्हणून 6 लाख रुपये उसने घेतले होते. पण वारंवार मागणी करूनही पैसे परत न केल्याने सुधीर चौधरी यांच्या तक्रारीनुसार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.