विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूरच्या ४३ वर्षीय सुनीता गटलेवार हिने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याचा प्रकार उघड झाल्याने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारगिलमधील हुंदरमन गावाजवळून ती पाकिस्तानात गेली होती. पाकिस्तानात अटक केल्यानंतर ती काही दिवसांत परत पाठविण्यात आली. तिच्यावर देशविरोधी हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी ‘ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Suspicion of Pakistani espionage: Nagpurs Sunita Gatlewar infiltrated Pakistan via Kargil serious claims made during investigation)
सुनीता काही काळापासून पाकिस्तानातील एका धार्मिक व्यक्तीशी सतत सोशल मीडियावर चॅट करत होती. हा संवाद तिच्या मोबाइलमधून स्पष्ट झाला आहे. सुरुवातीला तिला अमृतसर ग्रामीणमधील घरिंडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिथे झीरो एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर प्रकरण नागपूरला वर्ग करण्यात आले. नागपूरमध्ये पोहोचवल्यानंतर कपिलनगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला न्यायालयासमोर हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.
सुनीता गटलेवारने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, ती आपल्या १२ वर्षांच्या मुलाला बर्फ दाखविण्यासाठी कारगिलला घेऊन गेली होती. मात्र, तेथे पैसे संपल्यामुळे तिने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान ती पाकिस्तानात गेली, असा दावा तिने केला आहे. मात्र पोलिसांना तिच्या कथनात अनेक विरोधाभास आढळले आहेत.
पाकिस्तानी रेंजर्सनी तिला LOC ओलांडताना ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीनंतर ध्वजबैठकीच्या माध्यमातून तिला बीएसएफकडे सोपवण्यात आले. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या हवाली केले, आणि त्यानंतर कपिलनगर पोलिस पथक तिला गुरुवारी मध्यरात्री नागपूरला घेऊन आले.
तिच्याकडून मोबाइल, आधारकार्ड, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांना संशय आहे की, तिने चॅटिंगसह अनेक डेटा डिलीट केला आहे. त्यामुळे तिचा मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी सायबर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला असून, डेटा रिकव्हरीचे काम सुरू आहे. तिच्या संपर्कातील पाकिस्तानी व्यक्तींचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यासोबतच सुनीताचा मुलगा सध्या कारगिलमधील ‘बालकल्याण समिती’च्या (CWC) देखरेखीखाली आहे. त्याला परत आल्यानंतर पोलिस त्याची सखोल चौकशी करणार असून, सुनीताच्या कथनांची पडताळणी केली जाणार आहे.
सुनीता गटलेवारने चौकशीत मान्य केले की, तिचा सोशल मीडियावरून पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क होता. मात्र, तिने हे संबंध ‘व्यावसायिक कारणां’साठी असल्याचा दावा केला आहे. तरीही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना तिच्या उद्देशाबाबत मोठा संशय आहे.
पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की, “तिच्या मोबाइलचा सखोल तपास सुरू आहे. अमृतसर येथील तपास आणि तिथे दिलेली साक्ष यांचीही पडताळणी करण्यात येणार आहे. इतर तपास यंत्रणाही या प्रकरणात सहभागी होणार आहेत.”
सध्या सुनीता गटलेवारविरोधात कठोर कारवाई सुरू असून, हेरगिरीच्या संशयाला पुष्टी देणाऱ्या कोणत्याही पुराव्यांवरून तिच्यावर गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.