विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात मृतांचा आकडा शनिवारी २७४ वर गेला असून, यामध्ये विमानातील २४१ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजमधील ३३ जणांचाही त्यात समावेश आहे. टाटा समुहाकडून विमान पडून जमिनीवर मृत झालेल्यानाही एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. ( Tata Group will also provide Rs 1 crore assistance to those who died in the plane crash at B.J. Medical College.)
टाटा समूहाच्या निवेदनानुसार, अपघातात मृत पावलेल्या सर्व व्यक्तींना मग ते विमानात असोत किंवा जमिनीवर प्रत्येकी एक कोटी रुपये भरपाई दिली जाईल. तसेच, अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या वैद्यकीय खर्चाची संपूर्ण जबाबदारी टाटा समूहाने स्वीकारली आहे. “या कठीण काळात आम्ही सर्व संबंधित कुटुंबांसोबत आहोत. जखमी व्यक्तींना आवश्यक ती संपूर्ण वैद्यकीय मदत, उपचार आणि मानसिक आधार दिला जाईल,” असे टाटा समूहाकडून सांगण्यात आले आहे.
अपघातात मृत आणि जखमी झालेले बहुतेकजण मेघाणी नगर भागातील रहिवासी, बी.जे. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, विद्यार्थी आणि हॉस्पिटल कर्मचारी होते. विमान कॉलेजच्या होस्टेलवर कोसळल्याने अनेक विद्यार्थी वसतीगृहात अडकले होते. अपघातानंतर परिसरात भीषण आग आणि धुराचे लोळ पसरले होते. यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर उद्ध्वस्त झाला आहे.
टाटा समूहाने बी.जे. मेडिकल कॉलेजच्या होस्टेलची पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून, आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उभ्या करण्याचे आश्वासन दिले आहे.
विमानातील मृत प्रवाशांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांव्यतिरिक्त व्यतिरिक्त विमा कंपन्यांकडून देखील दीड कोटींच्या आसपासची भरपाई मिळणार आहे. एअर इंडिया विम्याचे प्रमुख विमाधारक हे टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स असून, त्यांच्या जोखमीचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. इतर विमाधारकांमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, न्यू इंडिया अश्युरन्स आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचा समावेश आहे. अंतिम भरपाईचा आर्थिक भार एआयजी या आंतरराष्ट्रीय पुनर्विमा कंपनीकडून उचलला जाणार आहे.
या अपघातातील एकमेव जिवंत बचावलेले विश्वास रमेश सध्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्यांनी सांगितले की, “टेकऑफनंतर ३० सेकंदातच एक जोरदार आवाज झाला आणि मग विमान कोसळलं. काही समजायच्या आतच सर्व काही उध्वस्त झालं.”
हा अपघात केवळ वैमानिक चूक की एखाद्या तांत्रिक घोटाळ्याचा भाग होता, याची चौकशी सध्या सुरू आहे. DGCA आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली असून, विमानाचे ब्लॅक बॉक्स आणि इंजिन प्रणालीची सखोल तपासणी केली जात आहे.