विशेष प्रतिनिधी
पुणे: केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) अधिकारी असून तसेच आंतरराष्ट्रीय एथिकल हॅकर असल्याची बतावणी करून एका शिक्षिकेला लग्नाची मागणी घालून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. ( Teacher cheated on marriage by pretending to be a CBI officer)
याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून शिरिष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३१९ (२) आणि ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही एक शिक्षिका आहे. ही महिला वानवडीमधील फातिमानगर येथे राहण्यास आहे. मागील वर्षी १८ जुलै रोजी आरोपी शिरिषने महिलेशी फेसबुकवरून ओळख केली. त्यानंतर तो महिलेच्या घरी आला. त्याने केंद्रीय अन्वेषण विभागात अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच परवाना असलेल्या आंतरराष्ट्रीय इथिकल हॅकर असल्याचे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेशी मैत्री वाढवली आणि तिला लग्नाची मागणी घातली.
त्यानंर शिरिषने स्वत: च्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी तसेच बहिणीच्या डिलिव्हरीसाठी यासोबतच वेगवगेळ्या कारणांसाठी महिलेकडून ऑनलाईन, कॅश तसेच धनादेशाद्वारे चार लाख रुपये घेतले. त्यासोबतच फिर्यादीकडे असलेली एक सोनसाखळी तसेच दोन अंगठ्या शुक्रवार पेठेतील एका खाजगी फायनान्स कंपनीकडे ठेवून त्यावर ८० हजारांचे कर्ज काढले. हे पैसे आरोपीने स्वत:साठी वापरले. दरम्यान, तक्रारदार महिलेने पैसे परत मागितले असता आरोपी पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि तिने वानवडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.