विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीटच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ आणि छेडछाडीची घटना उघडकीस आली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार हा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हॅन्ड असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या गुन्हेगारांवर कोणाचे वरदहस्त आहे? याची चौकशी करून सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे. (Teacher who sexually harassed a female student is MLA Sandeep Kshirsagars right hand Dhanjay Munde to check CDR)
संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर ते बेल्सपाल्सी आजारामुळे मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते. त्याचबरोबर विपश्यना करण्यासाठीही गेले होते. रविवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर आज विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीड लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी त्यांना या प्रकरणाची माहिती आणि निवेदन दिले आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमूण या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, तसेच आरोपींशी आमदाराचे असलेले कनेक्शन, घटना घडली त्याच दिवशी आमदारांची तिथे असलेली उपस्थिती आणि इतर गोष्टींचा सखोल तपास करावा. कारण हे प्रकरण आता फक्त पोलीस तपासापुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणामध्ये कोणाचे राजकीय संबंध आहेत, घटना घडल्यानंतर कोण कोणाला भेटलं, त्यांच्यात काय बोलणं झालं, फोनवरून काय चर्चा झाली, या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या पाहिजेत. त्यासाठी सीडीआरच नाही तर आईपीआरही तपासला पाहिजे, अशी मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून कोचिंग क्लासचा मालक आणि त्याचा पार्टनर त्या विद्यार्थीनीचा लैगिंक छळ करत होते. त्यामुळे या मुलीचे कुटुंब भेदरले होते. आपलं कोणी ऐकेलं का? कोणाशी कसं बोलावं? या विवंचनेत असतानाच पीडित मुलीच्या कुटुंबाच्या मनात आत्महत्येचा विचार आला. हे जेव्हा त्या मुलीला कळाले, तेव्हा तिने हिंमत दाखवील आणि आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कोणाचा वरदहस्त आहे का? संदीप क्षीरसागर राहतात ते घर कोणाच्या मालकीचे आहे? याची शोधपत्रकारिता करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना केली.