विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी थेट दिलेल्या इशाऱ्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आव्हान दिले आहे. मी इथे उभा आहे किंवा कुठे यायचे मला सांगा, मी यायला तयार असल्याचे म्हणतनारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे, असेही सुनावले आहे. ( Tell me where to come I am ready to come Prakash Mahajans challenge to Narayan Rane)
प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा दम नारायण राणेंनी प्रकाश महाजन यांना दिला आहे. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले, मी राज ठाकरे यांचा खरा कार्यकर्ता आहे. मी माझ्या घराचा पत्ता देखील सांगायला तयार आहे. मला मारहाण करून तुमच्या मनाचे समाधान होत असेल तर मारहाण करा. नारायण राणे यांना मी मायबोली मराठी भाषेत टीका केली आहे. राज ठाकरे वरील टीकेला, त्याच शब्दांत उत्तर दिले जाईल.
नारायण राणे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांच्या वयाचे आहेत. अशावेळी नारायण राणे यांनीच मुलाचे कान धरून मोठ्या व्यक्तीला कसे बोलायला हवे, हे शिकवायला हवे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. नारायण राणे यांनीच मुलांचे कान टोचायला हवे होते, असा सल्लाही महाजन यांनी नारायण राणे यांना दिला.
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतीच नीलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? असा सवाल करत प्रकाश महाजन हे लायकी पेक्षा जास्त बोलत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम करेन, असे धमकावले होते. त्यानंतर महाजन यांना राणेंच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकाला 20 आमदार दिले तर दुसऱ्याला शून्य आमदार दिले. आम्ही एवढे घाबरलो की आम्हाला झोप लागत नाहीये, एवढी भाजपला भिती वाटत आहे की आता आमचे कसे होणार? अशा शब्दांत नीतेश राणे यांनी राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेची खिल्ली उडवली होती. त्यावर प्रकाश महाजन यांनी टीका करणाऱ्यांनी आपल्या औकातीत रहावे. नितेश राणे यांची वैचारिक उंची ते उभे राहिले तर लवंग एव्हडी आहे अन् बसले तर विलायची येवढी होते. त्यामुळे आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. ते त्यांच्या वैचारिक उंची आणि रुंदी प्रमाणे सल्ले देत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी शक्तीच्या बाहेर धोंडा उचलू नये, असा सल्ला दिला होता.
यावरून राणे आणि महाजन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत. प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली अर्धा तास आंदोलन केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.