विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कर्वेनगर येथे राहणाऱ्या गनबोटे आणि जगदाळे या दोन कुटुंबांवर गोळीबार करण्यात आला. संतोष जगदाळे यांचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला आहे. कौस्तुभ गनबोटे हे जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
ही दोन्ही कुटुंबं मूळची बारामती तालुक्यातील असून, पुण्यातील वेदांत नगरीजवळ वास्तव्यास आहेत. मृतांमध्ये पुण्यातील दिलीप डिसले आणि मुंबईतील अतुल मोने यांचाही समावेश आहे.
या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट (TRF)’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून, आतापर्यंत किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.हल्ला अतिशय क्रूर पद्धतीने झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारल्यावर त्यांच्यावर बेधुंद गोळीबार सुरू केला. परिसरात अचानक गोळ्यांचा आवाज घुमू लागल्याने लोकांमध्ये भीती आणि गोंधळ पसरला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. जखमी पर्यटकांना तत्काळ अनंतनाग आणि श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पनवेलचे माणिक पाटील आणि एस. भालचंद्रराव हे जखमी असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. अमित शहा यांनीही तातडीने जम्मू-काश्मीरकडे रवाना होऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
सध्या संपूर्ण परिसर सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली असून, सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये गुजरातमधील सूरत, हरियाणा आणि दिल्ली येथील पर्यटकांचाही समावेश आहे.