विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनीने भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये एक नवे पर्व सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (Tesla enters India Chief Minister Devendra Fadnavis inaugurates first showroom in Mumbai)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “टेस्लाच्या आगमनाची आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होतो. टेस्लाने भारतात आपल्या व्यवसायाची सुरुवात महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबईमधून केली याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. हे केवळ एक शोरूम नसून येथे एक्स्पिरियन्स सेंटर, डिलिव्हरी हब, लॉजिस्टिक बेस आणि फुलफ्लेज सर्व्हिसिंग यंत्रणा उभारण्यात येणार आहे.”
महाराष्ट्र आज देशात इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचे नेतृत्व करत आहे. राज्यातील रस्ते हे जागतिक दर्जाचे आहेत आणि टेस्लाच्या कोणत्याही मॉडेलसाठी हे रस्ते परिपूर्ण आहेत. येत्या काही वर्षांत टेस्लाचे संपूर्ण इकोसिस्टिम महाराष्ट्रात साकारले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुंबईत शोरूम सुरु झाल्यानंतर टेस्ला कंपनीने त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल Model-Y भारतात उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. ही कार कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर SUV असून ती अत्याधुनिक टेक्नोलॉजीने सज्ज आहे. दिसायला स्टायलिश आणि परफॉर्मन्समध्ये प्रभावी असलेल्या या कारची मागणी यापूर्वीच जगभरात प्रचंड आहे.
भारतामध्ये मॉडेल-Y ची किंमत 60 लाखांपासून सुरू होते. बेस व्हेरिएंट (रिअर व्हील ड्राईव्ह) : ₹59.89 लाख (एक्स-शोरूम),
ऑन-रोड किंमत सुमारे ₹61.7 लाख आहे. रेड व्हेरिएंट (लाँग रेंज रिअर व्हील ड्राईव्ह) : ₹68.14 लाख,
ऑन-रोड किंमत अंदाजे ₹71.02 लाख आहे.
टेस्लाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार, ही किंमत इंपोर्ट ड्युटी आणि अन्य करांसह आहे. प्रत्यक्षात मूळ किंमत 27 लाखांदरम्यान असून, आयात शुल्क आणि भारतातील कर व रजिस्ट्रेशन भरून ही किंमत 48 ते 70 लाखांदरम्यान जाते.
टेस्लाने गेल्या काही महिन्यांत भारतात 10 लाख डॉलरहून अधिक इलेक्ट्रिक वाहने, चार्जिंग यंत्रणा आणि अॅक्सेसरीज आयात केल्या आहेत. यामध्ये अमेरिकेसह चीनमधूनही मोठ्या प्रमाणावर उपकरणे आयात करण्यात आली आहेत. सध्या Model-Y च्या सहा युनिट्स भारतात दाखल झाल्या आहेत आणि त्या प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत.
मुंबईसह पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये टेस्ला लवकरच सुपरचार्जर नेटवर्क सुरू करणार आहे. यामुळे टेस्ला ग्राहकांना लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक सोयीचा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर, स्थानिक टेक्निकल स्टाफला ट्रेनिंग देऊन, भारतात सेवा केंद्रांची मालिका उभारण्याचाही कंपनीचा मानस आहे.