विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याप थांबताना दिसत नाही. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कोकणात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कोकणातील ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी, अनेक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सामील झाले. आता कोकणातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असून, भाजपामध्ये प्रवेश केला आहे. (Thackeray group faces setback after setback in Konkanhundreds of office bearers join BJP)
मालवण नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षांसह १० प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. रवींद्र चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने अडीच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. त्यांनी जे काम केले, त्यामध्ये आम्हाला कधीच विरोधी पक्षाची वागणूक दिली नाही. मालवण शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्याचा आताही विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे. पर्यटनदृष्ट्या आम्हाला मालवणचा विकास व्हावा यासाठीच आम्ही भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहोत, असे मनोगत ठाकरेंच्या माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष देत असल्याचे म्हटले जात आहे. मालवणमधील या पक्षबदलांमुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.