विशेष प्रतिनिधी
मुंबइ ; दिल्लीतला टॉर्च बंद झाला की अंधारात हे कुठे जातील? त्यानंतर त्यांच्याबरोबर जे गेले आहेत त्यांची काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार नाही. यांचं भवितव्य बिकट आहे, असा हल्लाबाेल शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवबंधन कार्य अहवालाचे प्रकाशन केले. यावेळी बाेलताना ते म्हणाले,माझ्या हातात काहीही नाही तरीही आपली शिवसेना खरी आहे. आपल्याला शिवसेना प्रमुख म्हणाले होते ते आपल्याला करायचं आहे. नोकऱ्या मागणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा. पदं मागणारे होऊ नका, पदं देणारे व्हा. यांचं आयुष्य जे मिंध्याचं अरे काजवाही एवढासा असला तरीही स्वयंप्रकाशित असतो, हे स्वयंप्रकाशित कुठे? यांच्यावर तिकडून टॉर्च मारत आहेत तोपर्यंत हे दिसत आहेत. दिल्लीतला टॉर्च बंद झाला की अंधारात हे कुठे जातील? त्यानंतर त्यांच्याबरोबर जे गेले आहेत त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार नाही. यांचं भवितव्य बिकट आहे.
पुण्यात जीबीएस नावाचा रोग पसरतो आहे. तो रोग दुषित पाण्यामुळे पसरतो आहे. उत्तर द्यायला महापालिका कुठे आहे? ती विसर्जित झाली आहे. भाजपाकडेच पुणे महापालिका होती. जा मग नगरविकास खात्यात जे धेंड बसवलं आहे ना त्याला विचारा. काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस, पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होत आहेत, जबाबदार कोण? मंत्री असणार, दुसरा कोण? आम्हाला काही मिळालं तर आम्ही खुश नाहीतर आम्ही रुसूबाई रुसू, पण जनता शांत आहे, जनता पेटली तर तुमच्या घरात घुसू हेच म्हणेल, अशी कठाेर टीका ठाकरे यांनी केली.
जो काही कारभार सध्या चालला आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर हातात भगवा आणि शिवबंधन हवं. कार्य अहवाल करणारा हा शिवसेना एकमेव पक्ष आहे. हे लोक मुंबईचा सत्यानास करत आहेत. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे या राजधानीला भिकेचे डोहाळे लावले या लोकांनी, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.