विशेष प्रतिनिधी
पुणे : कर्जमाफी करण्यासंदर्भातील काही नियम पद्धत आहे. पण कर्जमाफीबाबत दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्यवेळी हा निर्णय सुद्धा राज्य सरकार निश्चितपणे घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ( The Chief Minister said that the government will not go back on any of its promises regarding loan waiver)
मुख्यमंत्री शनिवारी योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी वारकरी आणि पुणेकरांसोबत योगासने केली. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत अलेला असतानाही अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही शब्द फिरवणार नाही, असे सांगितले.
फडणवीस म्हणाले, सरकारचे सांगली व कोल्हापूरमधील पूरस्थितीवर लक्ष आहे. धरणांतून विसर्ग केव्हा सुरू करायचा व केव्हा बंद करायचा याचे नियोजन करण्यात आले आहे. शेजारच्या राज्यांशीही समन्वय ठेवला जात आहे. त्या राज्यांत आपला एक इंजिनिअर बसला आहे. पावसाळ्यात तो तिथेच असतो. त्याच्या माध्यमातून योग्य तो समन्वय साधला जात आहे. अर्थात निसर्गाचा भरवसा देता येत नाही. पण आपण आपल्या बाजूने पूर्ण नियोजन केले आहे.
पत्रकारांनी त्यांना पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, पण विभागांची स्थिती फारशी चांगली नाही, प्राध्यापकांचाही तुटवडा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, सर्वप्रथम मी पुणे विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन करतो. जगातील पहिल्या 600 विद्यापीठांत आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढील वर्षी किंवा 2 वर्षांत पहिल्या 500 विद्यापीठांत आपली विद्यापीठे असतील.
जगातील पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील कुलगुरू व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापक यांचे कार्य कौतुकास्पद आहे. तुम्ही ज्या तुटवड्याविषयी प्रश्न केला, त्याविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सर्वप्रकारच्या मान्यता दिल्या आहेत.