विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कोंढवा येथील २२ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने बलात्कार झाल्याची खोटी तक्रार दिल्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. ( The complaint of the young woman in the Kondhwa rape case is false says Police Commissioner Amitesh Kumar)
या प्रकरणात ताब्यात घेतलेला संशयित अनोळखी व्यक्ती नसून तरुणीचा मित्रच होता. तक्रारदार महिलेने रागाच्या भरात खोटी तक्रार दाखल केल्याचे कबूल केले आहे. तक्रार का दाखल केली, असे विचारले असता, महिलेने सांगितले की ती भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, जेव्हा आम्ही तक्रारदाराला तक्रारी मागील कारण विचारले, तेव्हा तिने कबूल केले की तिची मानसिक स्थिती अस्थिर होती, त्यामुळे बलात्कार झाल्याचा खोटा दावा केला.
या तपासात मोठ्या प्रमाणात संसाधने खर्च झाली. संशयिताचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता.
तक्रारदार तरुणीवर कायदेशीर कारवाईबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. तथापि, या प्रकरणातील अनेक पैलूंचा तपास अजूनही सुरू असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याने मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी तरुणीनेच एका ॲपद्वारे एडिट करून त्याखाली ‘मैं वापस आऊंगा’ असा धमकीवजा मेसेज लिहिल्याचे तपासात उघड झाले आहे. तरुणीने स्वतः याची कबुली पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणात ताब्यात घेतलेला तरुण हा तरुणीचा मित्र असून, त्याने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या दाव्यावर तरुणी ठाम आहे. मात्र, तरुणाने आपण तिच्या बोलावण्यावरूनच घरी गेल्याचा दावा केला असून, दोघांमधील व्हॉट्सॲप चॅटिंगही पोलिसांना मिळाले आहे. तपासात बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रेचा वापर झाला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे तरुणीने रचलेला बनाव पूर्णपणे उघड झाला आहे.
या घटनेने शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करत मोठी खळबळ उडवून दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी २२ पथके तयार केली होती. तब्बल ५०० पोलिसांनी कोंढवा ते बाणेरपर्यंतचे ५०० सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) तपासले. आरोपी तरुणाचा फोटो सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा फोटो ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान तरुणीला दाखवला असता, तिने दीड मिनिटे शांत राहून नंतर त्याला ओळखण्यास नकार दिला. तिच्या याच संशयास्पद प्रतिक्रियेमुळे पोलिसांना ती खोटे बोलत असल्याची खात्री पटली.
आरोपी तरुण एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पदावर असून, तो तरुणीच्या एका वर्षापासून संपर्कात होता. त्यांची ओळख एका वधू वर मेळाव्यात झाली होती. तांत्रिक तपासात तो तरुणीला अनेकदा फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण पाठवत असल्याचेही समोर आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः दोन वेळा कोंढवा पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला होता. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या खोट्या तक्रारीमागील सत्य उघड झाले.