विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर उपरोधिक भाषेत टीका केली आहे. “लग्न झालेलं नाही, पण नवरा-नवरी आधीच एकत्र संसार करायला लागलेत,” अशा शब्दांत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमधील वाढत्या जवळीकीवर निशाणा साधला. ( The couple is not married yet but they are living together Prakash Ambedkars blunt criticism of both the nationalist groups)
एका मुलाखतीत शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की, “भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र आले, तर आश्चर्य वाटू नये,” आणि याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, सध्या साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. पण त्यात कुठेही शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत नाही. अजित पवार हेच या निवडणुका पूर्णपणे हाताळत आहेत. अजून लग्नही झाले नाही, परंतु नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत.
पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजू मांडण्यासाठी केंद्राने परदेशात पाठवलेल्या पाकविरोधातील खासदारांच्या शिष्टमंडळावरून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले , पंतप्रधान मोदी सगळ्या देशांना जाऊन आले, पण युद्धामध्ये एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही. जिथे पंतप्रधान मोदी प्रभाव पाडू शकले नाही तिथे खासदारांचे प्रतिनिधी मंडळ काय करेल, चर्चा करतील पण हे शक्ती आणि संसाधन वाया घालवण्याचे काम आहे.