काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये आढळून आला आहे. हरियाणातल्या रोहतकमध्ये हा प्रकार उघडकीस आला. ( The dead body of a Congress woman worker was found in a suitcase)
रोहतक येथे शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान बस स्थानकावर ही सुटकेस आपली. रस्त्याच्या कडेला अशीच ठेवण्यात आली होती. काही लोक जवळ गेले, मात्र त्यांना काहीसा संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सूटकेस उघडली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला कारण या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे.
पोलिसांनी तातडीने या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. शनिवारी दुपारपर्यंत ही तरुणी कोण हे समजलं नव्हतं. मात्र नंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा असल्याची माहिती समोर आली.
मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रोहतकचे आमदार बीबी बात्रा यांना मिळाली. त्यांनी या तरुणीची ओळख पटवली आहे. हिमानी नरवाल ही काँग्रेसमध्ये सक्रीय होती. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत होती. हिमानीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही अनेकदा सहभाग घेतला होता. राहुल गांधींबरोबरचे तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.